
Maharashtra IMD Weather Update : राज्यात तापमानात मोठा बदल दिसून येत आहे. कुठे थंडी तर कुठे उष्णता असे चित्र आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीसह तापमानात देखील वाढ होणार आहे. तर ढगाळ हवामान देखील राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमानात घट झाली आहे. तर कोकण, मराठवाड्यात तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली आहे. उत्तरेत थंडीचा प्रकोप सुरूच आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर देखील होत आहे. हवेत गारठा आहे. पुढील काही दिवसांत हा गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या महितीनुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती असाम व आजू बाजूच्या परिसरात सक्रीय आहे. तर गुजरातपासून राजस्थानसह बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे वायव्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचे झोत वाहत असल्याने थंडी वाढली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या काही दिवसांत कमाल तापामानात बदल होणार नाही. तर किमान तापमान ३ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर तापमान घट होण्याची शक्यता आहे.
राज्यात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमान गहजात झाली आहे. पुण्यात तापमान १२ ते १८ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर सातारा, सांगली येथे देखील तापमान १३ ते १७ अंश सेल्सियस दरम्यान होते. परभणीत तापमान ११ अंशावर पोहोचलं आहे.
मुंबईतील तापमानात वाढ होत आहे. वातावरणातील गारवा कमी झाला आहे. मुंबईत दोन दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांताक्रुझचा पारा पुढील आठवडाभर ३५ अंशांच्या कमाल पातळीवर राहणार आहे, तर किमान तापमान २० अंशांच्या पुढे नोंद होणार आहे.
संबंधित बातम्या
