Maharashtra weather : मध्य महाराष्ट्र ते दक्षिण तामिळनाडू दरम्यान वाऱ्याची खंडितता म्हणजेच कमी दाबचा पट्टा हा आज हा तेलंगणा ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत जात आहे त्यामुळे हवेतील दमटपणा कमी झाला आहे. पुढील चार ते पांच दिवस कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यामध्ये पुढील पाच दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस तर मध्य महाराष्ट्रात आज शुक्रवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे, असा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर सांगली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पुण्यात आज दुपारी आकाश निरभ्र राहणार आहे. तर संध्याकाळच्या सुमारास आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. मेघ गर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० ते २४ एप्रिल पर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. तर संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ आणि २६ एप्रिलला मात्र, आकाश निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाली ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक शहरांच्या तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. पुण्याचे तापमानही उच्चांकी पातळीवर आहे. पुण्यात एप्रिल-मे महिन्यात ४० अंश तापमानाची नोंद बऱ्याचदा झाली आहे. तापमान वाढल्यामुळे गरज नसेल तर नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.