Maharashtra Weather Update: राज्यात बहुतांश जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. पुण्यात तर हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत देखील तापमान घटले आहे. या थंडीत पुढील काही दिवस आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात घट होणार आहे, तर विदर्भात पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा विदर्भावर हवेच्या वरील थरातील चक्रीय स्थिती ही पूर्व विदर्भावर गेली असून हवेची एक द्रोणीय रेषा ही दक्षिण कर्नाटका मधून विदर्भ व छत्तीसगड पर्यंत गेली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर हवेच्या वरच्या थरात एक चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे राज्यात आर्द्रता येत आहे. या मुळे पुढील ४८ तासात विदर्भात ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. तसेच वेळोवेळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाऱ्यांच्या दिशेतील बदलामुळे २९ जानेवारी पर्यंत किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
पुणे आणि परिसरात पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. पुढील ४८ तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. पुण्यात आजही कमी तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे १०.६ तर एनडीए परिसरात ८.७ डिग्री डिग्री सेल्सियस, तर पाषाण येथे १०.२ डिग्री सेल्सिअस एवढे कमी तापमान नोंदले गेले आहे. पुढील २४ तासात किमान तापमानात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे. तर २९ जानेवारी पर्यंत किमान तापमान जास्त काही बदल होणार नाही.
उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात देखील किमान तापमानात घट झाली आहे. नाशिकमध्ये बुधवारी ९.०, नगरमध्ये ९.३, जळगावात ९.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेले. पुढील २४ तासांत उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे तर काही भागात धुके पडण्याचा अंदाज आहे.
मुंबईसह कोकणातील तापमानात कमालीची घट झाली आहे. मुंबईतील किमान तापमान १५ डिग्री सेल्सिअस तर तर कोकणातही तापमान घटले आहे. रत्नागिरीत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस तर माथेरानमध्ये तापमान १२ अंश सेल्सिअसवर नोंदवल्या गेले.
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमान हे १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यामुळे जिल्ह्यात गारठा वाढला आहे. गेले चार पाच दिवस जिल्ह्यात ही स्थिती आहे. थंडीचे प्रमाण वाढलयाने नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत.