Maharashtra Weather Update : नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात किमान तापमानात आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्याच्या चारही उपविभागात तापमान हे ३५ शी च्या पुढे गेले आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे नोंदवण्यात आलं आहे. येथे ३७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सर्वात कमी तापमान नाशिक जिल्ह्यात नोंदवले गेले आहे. येथे पारा १९ डिग्री अंश सेल्सिअस होता. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडतांना नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या चारही उपविभागांमध्ये पुढील चार-पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात २४ तासांत फारसा बदल होणार नाही. त्यांतर तापमान २ ते ३ अंश डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत, पुण्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत कमाल तापमान ३२ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान १९.६ डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले. सांताक्रूझ येथे कमाल तापमान हे ३२.८ डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले. वाढत्या उकड्यामुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत आहे. पुण्यात देखील पुढील काही दिवस उकाडा राहणार आहे. पुण्यात सकाळी थंडी तर दुपारी गरम होत आहे. पुण्यात बुधवारी कमाल तापमान ३२. २ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस होते. पुण्यात पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहणार आहे. तर सकाळी धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पारा हा ३५ शी पार गेला आहे . सर्वाधिक तापमान हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे नोंदवण्यात आले आहे. येथे ३७ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर अकोला येथे ३४.९ कमाल तर किमान तापमान हे १९ डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले. अमरावती जिल्ह्यात ३५.४, बुलढाणा जिल्ह्यात ३१.१. चंद्रपूर जिल्ह्यात ३५.६, तर गोंदिया जिल्ह्यात ३४.८, नागपूर जिल्ह्यात ३४.७, वर्धा जिल्ह्यात ३४.४ तर यवतमाळ जिल्ह्यात ३५.४ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेले आहेत.
देशात प्रामुख्यानं उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. मध्य भारत व राज्यात मात्र, थंडी गायब झाली आहे महाराष्ट्रातील हवामानावर सध्या गुजरातच्या उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम होत आहे. तर अरबी समुद्रात सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळल्यामुळं ढगाळ वातावरणही पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच ही परिस्थिती आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि त्यातही मे महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढणार आहे.
संबंधित बातम्या