Maharashtra weather update : राज्यात आज कोकण, गोवा, मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, सांगली, सोलापूर, व सातारा जिल्ह्यात विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मॉन्सून पोचला आहे. विदर्भातील काही भागात अद्याप मॉन्सून पोहचला नाही. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, कोकणातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.
राज्यात सध्या मॉन्सून अमरावती व चंद्रपूरपर्यंत पोहोचला आहे. तर मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट् देखील मॉन्सूनने व्यापला आहे. सध्या मॉन्सून नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम सक्रिय झालेला नाही. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस होत असल्याने त्या ठिकाणचे शेतकरी सुखावले आहेत.तर शुक्रवारी (दि.१४) विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नगर जिल्ह्यात काही भागात हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. येत्या तीन दिवसांमध्ये संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नैऋत्य मौसमी पावसाची उत्तरी सीमा ही स्थिर आहे. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अहमदनगर पुणे व सोलापूर तर मराठवाड्यात आज लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस तर अमरावती व वर्धा जिल्ह्यात आज म्हणजे १४ जून तर १५ ते १७ जूनला गडचिरोली, चंद्रपूर गोंदिया तर नागपूरला १५ ते १७ जून या काळामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडासह वादळीवारा व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरात आज आकाश सामान्य ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी कोसळण्याची शक्यता आहे. आज १४ जून ते १६ जून दरम्यान, आकाश सामान्यत: अंशत: ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहील. तसेच हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या एक किंवा दोन सरी पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या