Maharashtra IMD Weather Update : राज्यात तापमानात अनेक चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवसांत राज्यातील तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात सध्या हवामान कोरडे असून पुढील काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. दारम्य, पुण्यासह मराठवाड्यात उष्णतेच्या झळा कायम आहेत. तर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. तापमानात घट होऊन थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात मंगळवारी ३४ डिग्री सेल्सिअस कमाल तर १४ डिग्री सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. उत्तर भारतातून दक्षिणेच्या दिशेनं येणाऱ्या वाऱ्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याने मुंबईतील थंडी कमी झाली होती. मात्र, मुंबईत आता पुन्हा हे वारे वाहू लागणार असल्याने मुंबईकरांना गारठा अनुभवता येणार आहे. हे थंड वारे नाशिक, ठाणे, नवी मुंबईसह मुंबईच्या दिशेने वाहणार असून त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवणार आहे. दरम्यान, मुंबईच्या हवेचा दर्जा देखील सुधारण्यास मदत होणार आहे .
पुण्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुण्याचा पारा हा ३४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी तापमान वाढलं आहे. पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यामध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात मंगळवारी किमान तापमान १४ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. मुंबईप्रमाणेच निफाडमध्येही पारा ८ अंशांवर गेल्यामुळं हवामानाचा काहीच नेम नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
मुंबईत कमाल तापमान २९.६ तर किमान तापमान हे २१.५ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले आहे. तर सांताक्रुज येथे कमाल तापमान हे ३२.८ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान हे १८.८ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर अलिबाग येथे २९.७ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आल आहे आहे.
पुढील दोन दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्र व पुण्यात किमान तापमानात काही अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिमी झंझावात ओसरल्यानंतर उत्तरेकडील वारे उत्तर-मध्य महाराष्ट्रात, विदर्भासह उर्वरित क्षेत्रात सक्रिय होणार असल्याने सकाळी व संध्याकाळच्या तापमानात मोठी घट होणार असल्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या