Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने दोन दिवसांपूर्वी तूफान हजेरी लावली होती. मुंबई, पुण्यात पावसाने कहर केला होता. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. असे असले तरी आज मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात घाट विभागात तर रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नाशिक, अहमदनगर, सातारा, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुणे विभागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर आज रविवारी २९ सप्टेंबर रोजी विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या सोमवारी (दि ३०) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरात हवामान आज व उद्या अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघ गर्जनेनुसार हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दिनांक ३० सप्टेंबर पासून पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची व हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आहे.