Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील दोन दिवस काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात १६ तारखेपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे १६ आणि १७ तारखेला विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वायव्य मध्य प्रदेश व लगतच्या भागावर असलेले तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा मध्य उत्तर प्रदेशावर आहे. आज दिनांक १४ सप्टेंबरला आणखी एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या आग्नेय बांगलादेशावर सक्रिय आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात दिनांक १६ व १७ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांना १६ व १७ सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.