Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत होती. मात्र, या वाढत्या उन्हापासून दिलासा मिळणार आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे वेध शाळेने दिली.
महाराष्ट्र राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात सिंधुदुर्ग वगळता उर्वरित जिल्ह्यात पुढील एक ते दोन दिवस वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत ४ ते ६ जूनला सिंधुदुर्गमध्ये ३ ते ६ जून पर्यंत मेघगर्जना विजांचा कडकडाट तर ताशी ४० ते ५० किलोमीटरच्या वादळीवाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाण्यात ४ ते ६ जूनपर्यंत रायगडमध्ये ३ ते ५ जूनपर्यंत रत्नागिरीमध्ये ३ जूनला व सिंधुदुर्गमध्ये दोन जूनला मोजक्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
पुणे व परिसरात आज आकाश मुख्यत: ढगाळ राहणार आहे. दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. ३ जून ते ५ जूनपर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील. तर काही ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व हलक्या पावसाची शक्यता आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या आणखीन काही भागात, लक्षद्वीप केरला व तमिळनाडूच्या उर्वरित भागात, कर्नाटक रॉयल सीमा व आंध्र प्रदेशच्या काही भागात, नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात, मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागात आज दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुढील दोन ते तीन दिवसात मध्य अरबी समुद्राच्या आणखीन काही भागात कर्नाटक रॉयल सीमा व कोस्टल आंध्र प्रदेशच्या आणखीन काही भागात, मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे.