Maharashtra Weather Update : राज्यात आज गणरायला निरोप दिला जाणार आहे. या दिवशी राज्यात काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार अति तीव्र कमी दाबाचा पट्टा आज पश्चिम बंगालचा उपसागर व लगतच्या झारखंडवर आहे. कोकण गोव्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी, विदर्भामध्ये काही ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण गोव्यात पुढील दोन दिवस हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील तीन चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व आजू बाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकास सामन्यत: कोरडे राहणार आहे. तर अधून मधून आकाश ढगाळ राहणार आहे. पुण्यातील घात विभागात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पूर्व मोसमी पाऊस या वर्षी त्याच्या ठरलेल्या वेळी माघार घेणार आहे. राज्यातून जवळपास पाऊस गायब झाला आहे. आता पाऊस दीर्घ विश्रांती घेण्याच्या तयारीत आहे. अधून मधून तयार होणारे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.