अरबी समुद्र ते दक्षिण गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तसेच हरियाणावर पश्चिमी विक्षोभ स्थिती असल्याचे यांचा परिणाम पश्चिम मध्य भारत व महाराष्ट्रावर होत आहे. राज्यातील कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये किमान तापमान उत्तर मध्य भागात व विदर्भात हळूहळू कमी होईल. पुढील चार पाच दिवसात तापमान ३ ते ४ अंशाने कमी होण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात हवामान ढगाळ राहण्याबरोबरच काही ठिकाणी हल्का पाऊस होण्याची शक्यता आहे. दाट धुके पडण्याचीही शक्यता आहे. ११ जानेवारीनंतर पुण्यात कमाल तापमानातही घट झाल्याने दिवसाही गारठा जाणवणार आहे.
गेल्या दोन दिवसात ऐन हिवाळ्यात आता पुन्हा पावसाचे ढग दाटून आले आहेत. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. रात्रभर झालेल्या पावसानंतर आता आजही राज्यात काही ठिकाणी मेजगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा फटका कोकणात आंबा, काजूच्या उत्पन्नाला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यामध्ये सध्या थंडी थोडी कमी झाली आहे. मात्र येत्या तीन चार दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज आहे. पुढील तीन दिवसांमध्ये दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात मुंबईत अंशतः ढगाळ वातावरण, धुके याचा अनुभव मुंबईकरांना येईल. परिणामी मुंबईतील धुरक्याची पातळीही वाढण्याची शक्यता आहे.