Maharashtra Weather Update : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील काही दिवस विदर्भ वगळता राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. कोकणात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उद्यापासून दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्यापासून दोन दिवस विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. वायव्य मध्य प्रदेश व लगतच्या भागावर असलेले तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असल्याने त्याचे रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. सध्या हा कमी दाबाचा पट्टा मध्य उत्तर प्रदेशावर आहे. तर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य बंगालचा उपसागर व आग्नेय बांगलादेशावर सक्रिय आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार आहे. आज कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उद्या व परवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस वातावरण कोरडे राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहणार आहे. पुण्यात शनिवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. तर आज शहरात आकाश मुख्यत: कोरडे राहणार आहे. तर अधून मधून वातावरण ढगाळ राहणार आहे. तर घट विभागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.