Maharashtra Weather Update : राज्यात पावसाळा संपून काही दिवस होऊनही काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ऑक्टोबर महिना संपून आता नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. असे असले तरी काही ठिकाणी तपमानात मोठी वाढ झाली आहे तर काही ठिकाणी थंडी वधू लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मारठवडा व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. या दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने वातावरण दूषित झाले आहे. या प्रदूषित हवेमुळे मुंबई आणि पुण्यात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली आहे. सध्या मुंबई, ठाणे व उपनगरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर राज्यात काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. त्यात कोकणात, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकणात पावसाची शक्यता आहे. काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान हे ३३ अंश सेल्सियस तर किमान तापमान २२ अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे, येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचे प्रमाण वाढणार आहे.