Maharashtra weather update : सध्या पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या जम्मू आणि पंजाब भागात आहे. व त्याची द्रोणीका रेषा ७२ पूर्व रेखांश व ३० डिग्री उत्तर अक्षांशावर आहे. तसेच उत्तर भारतात तीव्र स्वरूपाच्या जेट स्ट्रीमचा प्रभाव आहे. ९ फेब्रुवारीनंतर पूर्व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश, दक्षिण छत्तीसगड व तेलंगणाच्या काही भागात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे आद्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीच्या काळात विदर्भात ९ फेब्रुवारीला तूरळक ठिकाणी तर १० आणि ११ तारखेला काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यावर ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच या सुमारास मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
दरम्यान, उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येणे कमी झाले आहे, त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. थंडीची तीव्रता कमी होत असून, किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या वरच राहील, असा अंदाज आहे. सकाळी थंडी जाणवत असून, दुपारी मात्र उन्हाचा कडाका आता हळूहळू सुरू झाला आहे.
राज्यात ११ तारखेला आकाश वेळोवेळी ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. जसे जसे पश्चिमी विक्षोभ पूर्व दिशेला सारखे राज्यात आद्रता कमी होऊन ५ ते ८ फेब्रुवारीला आकाश निरभ्र राहील. सोबतच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नऊ तारखेनंतर किमान तापमानात हळूहळू वाढवण्याचा अंदाज आहे.
पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज पाच ते आठ तारखेपर्यंत आकाश निरभ्र राहील व या काळात किमान तापमानात ४ डिग्री सेल्सिअस पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. ९ तारखेनंतर आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहील व किमान तापमानात किरकोळ वाढवण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली होती. तिथे बर्फवारी आणि पाऊसही काही ठिकाणी पडत होता. परिणामी महाराष्ट्राकडे थंड वारे वाहत होते. त्यामुळे कडाक्याची थंडी पडत होती. ती आता काही अंशी कमी झाली असून, किमान तापमानातही वाढ झाली आहे. सोमवारी पुण्यातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. दुपारी चांगलेच उन्ह जाणवत आहे. सोमवारी पुण्यात एनडीए १५.५, शिवाजीनगर : १६.२, पाषाण : १७.१, हडपसर : १९.४, मगरपट्टा : २१.५, वडगावशेरी : २२.३ एवढे तापमान नोंदवले गेले.
संबंधित बातम्या