Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या आठवड्यात धुमशान घातलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. आज व पुढील काही दिवस फक्त राज्याच्या किनारपट्टी भागात, घाटमाथा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कालच्या अति तीव्रदाबाच्या शेजारी तीव्रता कमी होऊन ते तीव्र दाब क्षेत्र झाले असून ते आज ईशान्य राजस्थान व लगतच्या भागावर आहे. पुढील बारा तासात त्याची तीव्रता अजून कमी होण्याची शक्यता आहे. दक्षिण पाकिस्तान व लगतच्या नैऋत्य राजस्थानवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज दक्षिण पाकिस्तानकडे सरकले आहे. समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात ते उत्तर किनारपट्टीत समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा आज स्थिर आहे. आज ६ व ७ ऑगस्ट रोजी कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
आज कोकण, पुणे साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील तीन दिवस ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज पासून पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी आजपासून पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी आज खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.