Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील महिन्यात शनिवारपर्यंत राज्याच्या बहुतेक भागांत उघडीप असणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून जोरदार पाऊस पडणार नाही. गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे आज कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोव्यात पुढील चार ते पाच दिवस बऱ्याच ठिकाणी तर विदर्भामध्ये आज काही ठिकाणी व पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये उद्या ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबरला मेघ गर्जना व विजांचा कडकडासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. बीड, लातूर व धाराशिव येथे उद्या ३० तारखेला व सोलापूर येथे १ ऑक्टोबरला मेघ गर्जना व विजांच्या कडकडासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबरला यलो अलर्ट दिलेला आहे.
राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.