Maharashtra Weather Updates: राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात थंडी जाणवू लागली आहे. तर, अनेक भागांत ऊन-पाऊस पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा आणि घाट परिसर, सातारा जिल्हा आणि घाट परिसर आणि सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, उद्या १६ नोव्हेंबर रोजी पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचीही शक्यता आहे.
राज्यात १७ नोव्हेंबरपर्यंत राज्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. एकंदरीत नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान संमिश्र राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत सकाळी ऊन आणि रात्री थंडी राहील. कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा १२ अंशांनी घसरला आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस अपेक्षित आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नोव्हेंबर महिना अर्ध्यावर आला तरी मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपूर्वी किमान तापमान २० अंशांपर्यंत खाली गेले होते. परंतु, आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. आता २१ नोव्हेंबर नंतर तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. मात्र, तोपर्यंत मुंबईसह उपनगरातील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.