Maharashtra weather update : राज्यात आज मंगळवारी देखील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. विदर्भात वर्धा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात काही भागात गारपीट आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. दरम्यान, आज मंगळवारी मराठवाड्यात काही ठिकाणी अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील २४ तासात तुरळ ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विशेषतः अमरावती नागपूर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
सध्या एक पश्चिमी प्रकोप कमी दाबाच्या रेषेच्या स्वरूपात ६० डिग्री पूर्व व ३० डिग्री उत्तरेवर आहे. वाऱ्याची एक चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात वर व दुसरी मराठवाड्यावर आहे. आणखी एक वाऱ्याची चक्रीय स्थिती पश्चिम विदर्भावर आहे. नवीन एक पश्चिमी प्रकोप हिमालयावर १७ तारखेला प्रभावित करणार आहे. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज ठिकाणी अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील २४ तासात तुरळ ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये पुढील काही दिवस तापमानात फारसा बदल होणार नाही.
पुण्यात पुढील ४८ तासात वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. १४ तारखेनंतर २ ते ३ दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. १७ तारखेच्या संध्याकाळपासून एक ते दोन दिवस किमान तापमानात किंचित वाढवण्याची शक्यता आहे. पुढील चार-पाच दिवस किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट देखील झाली. या पावसाचा फटका तूर, कापूस, सोयाबीन या पिकांना झाला. आज देखील विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.