Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, हा पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात शनिवारपासून पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हा पाऊस पडणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड व त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रीय आहे. व तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. ते उत्तर मध्य प्रदेश व लगतच्या भागावर असून यामुळे पुढील दोन दिवस म्हणजे १९, २०, २१ सप्टेंबर रोजी कोकणात व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात २० व २१ सप्टेंबरला जळगावला तर २१ सप्टेंबरला अहमदनगर व सोलापूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात २० व २१ सप्टेंबरला बहुतांश ठिकाणी तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात २१ व २२ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात व विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार १९ व २० सप्टेंबर रोजी राज्यात मराठवाड्यासह खान्देशात हलक्या सरींच्या पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी पावसाचा जेार मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, रायगडसह मराठवाड्यातही राहण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी (दि २०) सप्टेंबर रोजी जळगाव जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर शनिवारी (दि २१) सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी (दि २२) संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे.
पुणे व परिसरात पुढील तीन दिवस आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.