Maharashtra weather Update: राज्यात मौसमी पावसाने आगेकूच सुरू ठेवली आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पेरणीच्या दृष्टीने वातावरण चांगले होत आहे. दरम्यान, आज देखील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर, पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल ही राज्याच्या आणखी काही भागात झाली आहे. पावसाची उत्तरी सीमा ही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, विजापूर, सुखमा, विजयानगर व इस्लामपुर येथून जात आहे. कोकण, गोवा व विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पुढील चार पाच दिवस काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तर मराठवाड्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मेघ गर्जना आणि वीजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होऊन काही तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज कोकण गोवा व विदर्भात ताशी 30 ते 40 किमी वेगाने, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरात पूढील चार ते पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या एक ते दोन सारी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.