Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसासह थंडी देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हिवाळ्यात स्वेटरसह छत्री देखील सोबत ठेवण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. विशेषत: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहून थंडी वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर एक चक्रीय चक्रवात स्थित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात दोन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसणे वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी विरळ धुके पडणण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकाश ढगाळ राहून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर भारतात थंडीचा कहर कायम आहे. दिल्लीमध्ये थंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी ऊन पडल्याने नागरिकांना हलका दिलासा मिळाला. वायव्यवेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे दिल्लीचे किमान तापमान ७.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. दाट धुक्यानेही या भागाला वेढले होते. एक दिवस आधी किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस होते. ही घसरण कायम राहणार असून शुक्रवारपर्यंत किमान तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. नव्या पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे या आठवड्यात हवामानात मोठे बदल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान खात्याने आज आणि उद्या दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी कमाल तापमान २१ आणि किमान तापमान ०५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे थंडी वाढणार आहे. त्याचवेळी वाऱ्याचा वेग ताशी दोन ते सहा किलोमीटर राहील, त्यामुळे दाट धुके पडण्याची शक्यता आहे. विभागाने गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट आणि शुक्रवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राजधानीसह हरयाणा, यूपी, बिहार आणि झारखंडमध्येही कडाक्याची थंडी जाणवत आहे. बुधवारी सकाळी राजधानीच्या बहुतांश भागात दाट धुके दिसून आले. विशेषत: पालम हवामान केंद्रातील दृश्यमानतेची पातळी पहाटे साडेपाच ते सहा या वेळेत शून्यावर आली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) संकेतस्थळावर सकाळी नऊ वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३२४ ('अत्यंत खराब') नोंदविण्यात आला. दरम्यान, स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, सतत थंड वारे वाहत आहेत, ज्यामुळे दिवसाही थंडी जाणवत आहे. उन्हातही या वाऱ्यांमुळे थंडी वाढेल आणि कमाल तापमान कमी राहील. किमान तापमानातही झपाट्याने घट होणार आहे. नवीन पश्चिमी विक्षोभ येत असल्याने शनिवारपासून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. '
आठवड्याच्या शेवटी वारे पुन्हा मंदावतील, परंतु दिल्ली-एनसीआरसह मैदानी भागात ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडेल. या काळात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असली तरी कमाल तापमान कमीच राहणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, गुरुवारी आकाश ढगाळ राहील. शुक्रवारी ढगाळ वातावरण राहील. शनिवारी आकाश निरभ्र राहील. रविवारी पश्चिम विक्षोभामुळे हवामान बदलेल आणि दिल्ली-एनसीआरमध्ये हलका पाऊस पडेल. सोमवारीही पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी आकाश निरभ्र राहील.
संबंधित बातम्या