Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतीविषयक कामांना वेग आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात खरीप पेरण्या अंतिम टप्यात आल्या आहे. दरम्यान, पाऊस कमी झाला असला तरी कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. आज देखील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना देखील आज यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, कालपासून पाकिस्तान व लगतच्या वायव्य राजस्थानच्या भागावर असलेला कमी दाबाचे क्षेत्र आज पाकिस्तानच्या मध्यभागावर आहे. त्याची तीव्रता कमी झालेली आहे. आज समुद्रसपाटीवर असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत आहे. त्याची तीव्रता कमी झालेली आहे. एक पूर्व-पश्चिम द्रोणीय क्षेत्र पूर्व बिहार पासून राजस्थान उत्तर प्रदेश पर्यंत आहे. कोकण गोव्यात पुढील चार-पाच ते सात दिवस व आज विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच ते सात दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी आणि विदर्भामध्ये पुढील चार ते पाच दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार म्हणजे २४ तासात ६५.५ मिलिमीटर ते ११५.५ मिलिमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ७ ते ११ ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात पुढील दोन ते तीन दिवस तर कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात उद्या सात तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांच्या घाट विभागासाठी यलो अलर्ट दिलेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे ७ व ८ ऑगस्टला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना व पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना आठ तारखेला यल्लो अलर्ट दिलेला आहे. आज औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे.
विदर्भाच्या संपूर्ण भागात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना व विजांच्या कडगडाटा सहित पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भासाठी पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट दिलेला आहे.
पुणे व साताराच्या परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पाडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागात यलो अलर्ट दिलेला आहे.