Maharashtra Weather Update : राज्यात काही ठिकाणी पावसाचा कहर सुरूच आहे. आज शुक्रवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कोकणात, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात व मराठवाड्यात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह पालघर ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी येत्या २ दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबई शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मुंबईत कमाल तापमान ३१ डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान २२ डिग्री सेल्सिअस असेल. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या महितीनुसार उत्तर भारतातील व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज त्याच ठिकाणी स्थिर असून यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण पुढील सात दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्याच्या घाट विभागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांत देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.