पुणे : वायव्य आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे जे क्षेत्र तयार झाले होते त्याचे रूपांतर चक्रिय स्थितीत झाले असून ते हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. यामुळे राज्यात आजपासून बहुतांश ठिकाणी मॉन्सून सक्रिय होणार आहे. राज्यात पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज आणि उद्या पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, मुंबई, नागपूर, वर्धा, भंडारा, वाशिम, अमरावती जिल्ह्यात पवासाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज सकाळ पासून सायन, दादर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाल्याने वाढत्या उकड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
पुणे आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील वर्धा नागपूर यांना ऑरेंज तर इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातही आज जोरदार पावसाची शक्यता असून पुढील काही दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात आज बऱ्याच ठिकाणी मुळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. चक्रिय स्थिती राज्याकडे येत असल्याने पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. १० तारखेनंतर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात देखील १० तारखेनंतर पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, वाशिम, भंडारा, वर्धा जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज पासून पुढील काही दिवस नागपूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली, भंडारा आणि अमरावती तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी मारठवड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगली, बीड या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईसह ठाण्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात आज वातावरण सामान्यत: ढगाळ राहणार असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. ७ आणि ८ तारखेला आकाश ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच पावसाच्या काही तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. ९, १०, ११ तारखेला आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.