Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! अवकाळी पाऊस व थंडीच्या लाटेचा IMD चा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! अवकाळी पाऊस व थंडीच्या लाटेचा IMD चा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! अवकाळी पाऊस व थंडीच्या लाटेचा IMD चा इशारा

Dec 26, 2024 07:28 AM IST

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान शास्त्र विभागाने पुढील काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या सोबतच वर्षाच्या शेवटी व नवीन वर्षाच्या सुरवातीला थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यावर दुहेरी संकट! अवकाळी पाऊस व थंडीच्या लाटेचा IMD चा इशारा
राज्यावर दुहेरी संकट! अवकाळी पाऊस व थंडीच्या लाटेचा IMD चा इशारा (ANI)

Maharashtra Weather Update : राज्यावर वर्षाच्या शेवटी व नवीन वर्षाच्या सुरवातीला आस्मानी संकट कोलसळणार आहे. राज्याच्या  हवामानात मोठा बदल होणार असून अवकाळी पाऊस व थंडीची लाट असे दुहेरी संकट येणार आहे. यामुळे बळीराजाच्या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस  धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट विभाग, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य व लगतच्या पश्चिम मध्य बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तम तामिळनाडू किनारपट्टीवर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेकडे सरकले आहे.  पुढील २४  तासांत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ते काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज २६  व २७  डिसेंबररोजी  धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्याच्या  मैदानी तसेच घाट विभाग व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वाऱ्याचा वेग हा ताशी ३०  ते ४०  किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. 

२७  डिसेंबर रोजी अहिल्यानगर, पुणे,  जिल्ह्याचा मैदानी तसेच घाट विभाग, परभणी, बीड, नागपूर हिंगोली, वाशिम व यवतमाळ जिल्ह्याच्या तुरळक भागात मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ५०  ते ६०  किलोमीटर ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. २७  तारखेला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना तसेच विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा व वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २८ डिसेंबरला जळगाव, अहिल्यानगर,  छत्रपती संभाजी नगर,  जालना,  बीड,  अमरावती, गोंदिया,  व नागपूर जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी,  मेघगर्जना व विजांच्या कडकडाट व जोरदार  पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

पुण्यात असे असेल हवामान 

 पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे.  तसेच उद्यापासून तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

उत्तरेतील राज्य गारठली 

नववर्ष साजरे करण्याच्या तयारीत नागरिक असतांना त्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. भारताच्या वायव्येकडील राज्यांमध्ये थंडीने कहर केला आहे. अनेक शहरांमध्ये पारा उणे पर्यंत गेला आहे.  भारतीय हवामान शास्त्र विभागाने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.  २६ व २७ डिसेंबर रोजी या भागात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

 श्रीनगरमध्ये मंगळवारी रात्री उणे ७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जी आदल्या दिवशी उणे ६.६ अंश सेल्सिअस होती. पाण्याच्या पाईपलाईन आणि जलाशय गोठल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हिमाचल प्रदेशातही परिस्थिती गंभीर असून २५-२६ डिसेंबररोजी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मनालीतील तापमान उणे २.१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील ताबो हे हिमाचल प्रदेशातील उणे १०.६ अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात थंड ठिकाण ठरले. पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये २५ आणि २६ डिसेंबरला थंडीचा इशारा कायम आहे.

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन दिवस वायव्य भारतातील तापमानात अंश सेल्सिअसने घट होईल. त्यानंतर हळूहळू वाढ अपेक्षित आहे. मध्य भारतात आठवड्याच्या अखेरीस तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये येत्या तीन दिवसांत तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. या हिवाळ्यात नवीन वर्षाच्या आनंदाचे थंडीत रूपांतर होऊ शकते. सेलिब्रेशनची तयारी करत असाल तर उबदार कपड्यांची काळजी घ्या आणि थंडीच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी उपाय करा.

 

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर