Maharashtra Weather update : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून काही भगत जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुण्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापुर, रत्नागिरी, रायगडसह पश्चिम घाटात पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा कायम आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पुढील तीन ते चार दिवस दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण भागात आज व उद्या काही ठिकाणी तर ७ जूनला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात ८ तारखेला बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर पुढील तीन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ८ व ९ तारखेपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भामध्ये ८ तारखेपासून पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस व मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात ८ व ९ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात ८ तारखेला मुसळधार व ९ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग येथे ८ व ९ तारखेला तर कोल्हापूर येथे ९ तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये आज सहा जूनला मेघ गर्जना विजांच्या कडकडाट व ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तसेच गारा पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाट असेल ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुण्याला गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपले आहे. मंगळवार आणि बुधवारी पुण्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील बहुतांश रस्ते तुंबले होते. पुण्यात पुढील तीन दिवस दुपारी व संध्याकाळी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.