Maharashtra Weather update : देशात उत्तरेकडे थंडीची लाट कायम आहे. पुढील दोन दिवस उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार आहे. महाराष्ट्रात देखील थंडी वाढणार आहे. या सोबतच काही जिल्ह्यात हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हा पाऊस होणार आहे. यानंतर तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. मुंबई आणि पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
दक्षिण कर्नाटक ते मध्ये छत्तीसगड पर्यंत असलेली द्रोणिका रेषा आज दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भ पर्यंत आहे. तसेच हवेतील वरील स्तरातील चक्रीय स्थिती उत्तर कोकण आणि लगतच्या परिसरावर असल्यामुळे राज्यात आद्रता वाढली आहे. यामुळे विदर्भात २१ ते २४ तारखेपर्यंत तर मराठवाड्यात उद्या आणि परवा तुरळ ठिकाणी अति हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती जिल्ह्यात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात हळूहळू एक ते दोन डिग्री सेल्सियसली घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच २१ ते २३ तारखेपर्यंत पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे. मुंबईत देखील तापमानात कमालीची घट झाली आहे. रविवारी मुंबईचे तापमान हे १६ डिग्री सेल्सिअस एवढे होते. पुढील काही दिवस मुंबईचे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे तरकारी पिकांवर परिमाण होण्याची शक्यता आहे. आधीच कमी पावसामुळे शेतकाऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्याने पिकांवर याचा परिमाण होणार आहे.