Maharashtra weather update : राज्यात गुलाबी थंडीत सरत्या वर्षाला निरोप देऊन जल्लोषात नवीन वर्ष साजरे करण्यात आले. या नव्या वर्षात पुढील काही दिवस राज्याच्या हवमानात अनेक बदल अनुभवायला मिळणार आहे. राज्यावर कोणतीही वेदर सिस्टिम नसल्याने येत्या काही दिवसात राज्यातील तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा वगळता कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता देखील आहे. मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात तर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात १ ते ७ जानेवारी दरम्यान काही ठिकाणीच ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यावर कुठलीही खास सिस्टीम नसल्यामुळे संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात येणाऱ्या साऊथ वेस्टरली आणि सदरली वाऱ्यांमुळे दोन तारखेनंतर पुढील तीन ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन तारखेनंतर पुढील तीन-चार दिवस किमान तापमानात एक ते दोन डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात दोन तारखे नंतर तीन ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून किमान एक ते दोन डिग्रीने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यातील हवामानावर मोठा परिमाण पुढील काही दिवस पाहायला मिळेल. देशात उत्तरेकडे थंडीची लाट कायम आहे. राजधानी दिल्लीत रविवारी हंगामातील सर्वात कमी तापमानात ५ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. उत्तर भारतात पुढील काही दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांत दाट धुके पडण्याची शक्यता आहे.