maharashtra weather update : देशावर सध्या एक पश्चिमी विक्षोभ म्हणजेच थंड हवेचा झंझावात हिमालयीन परिसरात सक्रिय आहे. हा पश्चिमी विक्षोभ आता ७० डिग्री पूर्व आणि ३२ डिग्री उत्तरच्या उत्तरेला आहे. यामुळे एक कमी दाबाची रेषा आज मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडू पर्यंत आहे. यामुळे राज्यावर अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभाकहा परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे. यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २५ ते २७ तारखेला तुरळ ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील २४ तासात २४ फेब्रुवारी नंतर पुढील ४ ते ५ दिवस तुरळक ठिकाणी सामान्य ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ व २६ तारखेला विदर्भात तुरळ ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. २६ तारखेनंतर आकाश ढगाळ राहणार आहे. पुण्याच्या कमाल तापमानात पुढील ४८ तासात जवळपास दोन ते तीन डिग्री सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे. परंतु २५ तारखेनंतर हळूहळू किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. या भागात सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या