Maharashtra weather update : राज्यात पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पासून (दि २४) पुढील ४ दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भाती काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज मंगळवारी (२४ सप्टेंबर) बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य पावसाने पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागातून माघार घेतली आहे. दरवर्षी मॉन्सून सामान्यत: १७ सप्टेंबर रोजी माघारी फिरत असतो. मात्र, यावर्षी २३ सप्टेंबर रोजी कोकण मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात परभणी बीड हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर २५ सप्टेंबरला कोकणातील रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अत्यंत जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २६ सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार दिवस व ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरातील अंदाज आज पासून पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहून मेघ गर्जना व वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २६ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.