Maharashtra Weather Update : राज्यात कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पुरसदृश्य स्थिती आहे. कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे आज देखील कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात रायगड येथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडला रेड तर मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीवरील उर्वरित जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पश्चिम घाटाच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अन्य भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात असे असेल हवामान
पुण्यात आणि मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. आज दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत व उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. सोमवारी देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. घाट विभागात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पुण्याच्या घाट विभागात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत हळू हळू वाढ होत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर व साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाचा काही सरी पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात काही ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे घाट विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
संबंधित बातम्या