IMD alert for maharashtra : राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला असताना हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानं चिंता वाढवली आहे. येत्या काही तासांसाठी हवामान विभागानं राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर, ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषत: पुणे जिल्ह्यात काल पावसानं जोर धरला. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणं, ओढे, नद्या भरून वाहू लागल्या आहेत. पुणे शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे, रायगड साताऱ्यातही अशीच परिस्थिती आहे.
पावसानं असा जोर धरला असतानाच हवामान विभागानं मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर, पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुंबई व मुंबई उपनगर वगळून राज्यात मागच्या २४ तासांत सरासरी ३३.७ मिमी पाऊस झाला आहे. तर, मुंबई शहरात ६२.५ व मुंबई उपनगरात ८६.१ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासांत राज्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. पुणे नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्यानं विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. तर, मुळशी तालुक्यातील आदरवाडी इथं दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत एनडीआरएफची ११ पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर, ७ पथकं राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी मुंबई व रत्नागिरीत प्रत्येकी दोन पथकं आहेत. ठाणे, पालघर, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत प्रत्येकी १ पथक आहे. ही पथकं ३१ ऑगस्ट पर्यंत तैनात राहणार आहेत. तर, ७ पथके राखीव असून ती सध्या मुंबई, पुणे व नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. तर, एसडीआरएफची ६ पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.
> महावितरणने आवश्यकतेनुसार वीज पुरवठा बंद करावा.
> पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा.
> लवासा व ताम्हिनी इथं दरड कोसळल्याच्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवा.
> कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, पुणे, रायगड व मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन व विकास निधीतून खर्च करावा.
संबंधित बातम्या