Weather News: राज्यातील बहुंताश जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून आज (११ ऑगस्ट २०२४) रायगड, पुणे, नागपूरसह सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात पावसाची मुख्यत: उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना अशरक्ष: झोडपून काढल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील काही भागातच पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्यात रायगड, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, तळकोकणातील काही भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडीत मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले. शनिवारी सकाळपर्यंत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. तर, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
आयएमडीने १० ऑगस्ट रोजी आपल्या व्हिडिओ अंदाजात नमूद केले आहे की, सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ते कर्नाटक पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे, त्यामुळे पुणे आणि कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्र उपविभागातील इतर ७ जिल्ह्यांसाठी हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांसाठीही असाच अलर्ट जारी करण्यात आला आहे. ११ ऑगस्टलाही पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, १२ ऑगस्टपासून पुणे जिल्ह्यासाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. पुढील आठवडाभर पुणे शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या प्रमुख मेधा खोले यांनी व्यक्त केली आहे.
हवामान अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, ‘आयएमडी मॉडेलने पश्चिमेकडील वारे कमकुवत होत असल्याचे सूचित केले आहे. आणि मान्सूनचा ट्रफही उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे १२ ऑगस्टपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल आणि घाट विभागातही पावसाचे प्रमाण कमी होईल. या काळात आकाश प्रामुख्याने ढगाळ राहणार असून पुण्यात वेळोवेळी अडीच ते पंधरा मिलिमीटर पावसाची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून पुण्यासह महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढेल आणि तो सप्टेंबर अखेरपर्यंत जाईल.'