Maharashtra weather Update : राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने हजेरी लावली होती. यानंतर राज्यात थंडी गायब झाली होती. काही जिल्ह्यात पाऊस झाल्यावर तापमानात वाढ झाली होती. आता राज्यावर पुन्हा पावसाचे संकट असून तापमानात देखील दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रावर असलेले एक चक्रीय चक्रवाद आज विरून गेले आहे. संपूर्ण राज्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस कोकण आणि गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात ११ व १२ जानेवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस किमान तापमानात दोन ते तीन सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस दोन ते तीन अंश सेल्सिअसने किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात दोन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. ९ ते १३ जानेवारी आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी व संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढली आहे. पुण्यात सकाळी आणि संध्याकाळी थंडी पडत असून दुपारी मोठ्या प्रमाणात ऊन पडतं. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने पुढील काही तासांत राज्यात पावसाची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात किमान तापमानात चढ उतार होत आहे. राज्यात कोरडे वारे वाहत आहे. तर बहुतांश ठिकाणी तापमानात घट झाली आहे. पुण्यात १२ ते १५ अंश सेल्सिअसची नोंद मंगळवारी झाली. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तापमान ११ ते १६ अंशांपर्यंत आले होते.
संबंधित बातम्या