Havaman Batmya : राज्यात पुढील तीन दिवस तापमानात कमालीचा बदल अनुभवायला मिळणार आहे. थंडी गायब झाली असून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेले काही दिवस ढगाळ हवामान होते. तसेच काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस होण्याचे वातावरण देखील होते. मात्र, आता तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू काश्मीर व त्यालगत उत्तर पाकिस्तानमध्ये चक्राकार वारे वाहत असून त्याचा परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे. पुढील तीन दिवस राज्यातील हवामान बदलणाार आहे. अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळं देखील राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र, आता तापमान वाढणार असल्याने नागरिकांना उकड्याला सामोरे जावे लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस किमान तापमानात दोन ते चार डिग्री सेल्सिअस ने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागणार आहे.
पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. तसेच सकाळी विरळ धुकेपडण्याची शक्यता आहे. किमान तापमानात एक ते दोन डिग्री सेल्सियस ने वाढवण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात सामान्य तापमान वाढलं होतं. कोकण, विदर्भात देखील तापमान १ ते ३ अंशांनी वाढलं होतं. उत्तरे कडील राज्यात थंडीची लाट असली तरी राज्यात मात्र, तापमान वाढणार आहे. विदर्भात कमाल तापमानात फारसा परिणाम जाणवणार नाही. येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जांवण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) या आठवड्यात वायव्य भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे येत्या काही दिवसांत या भागातील किमान तापमानातही वाढ होऊ शकते. पंजाब आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्ये दाट धुक्यात हरवणार आहे.
आयएमडीने बुधवारी रात्री जारी केलेल्या अपडेटनुसार, गुरुवार, २ जानेवारीपर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड, ओडिशामध्ये पहाटे आणि रात्री उशिरा दाट धुके पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उपहिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम मध्ये ३ जानेवारीपर्यंत असे हवामान कायम राहू शकते. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये ६ जानेवारीपर्यंत सकाळ-संध्याकाळ दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात २ जानेवारीला थंडीचा दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पंजाब, हरयाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात गुरुवारी सकाळ-संध्याकाळ थंडीचा कडाका राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये ३, ४ आणि ५ जानेवारीला धुके पडण्याची शक्यता आहे.
५ जानेवारीला जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुजफ्फराबाद मध्ये मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. तसेच हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
बुधवारच्या रात्रीच्या अपडेटनुसार, पुढील पाच दिवसांत वायव्य भारतात किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात ३ दिवसांनंतर किमान तापमानात वाढ होऊ शकते. महाराष्ट्रात ३ दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील पाच दिवसांत मध्य भारत आणि गुजरातमधील किमान तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता कमी आहे.
संबंधित बातम्या