Maharashtra IMD Weather Update : राज्याच्या तापमानात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात थंडी गायब झाली असली तरी सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यात तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. काही जिल्ह्यात सकाळी तापमान १० डिग्री सेल्सिअस तर दुपारच्या तापमानात मोठ वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. राज्यात पुढील काही दिवस कोरडे हवामान राहणार असून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चक्राकार वारे हे उत्तर पाकिस्तान व पश्चिम राजस्थान परिसरात आहे. पश्चिमी चक्रवाताचा सक्रिय प्रभाव आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह देखील सक्रिय आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होणार आहे.
राज्यातील अनेक भागांमधून थंडी गायब झाली आहे. मराठवाड्यातील काही ग्रामीण भागात पारा १० अंशांवर आला आहे. तर दिवसाचे तापमान वाढले आहे. पुढील ४८ तासांत यात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत व उपनगरात सकाळी थंड वारे, तर दर दिवसभर उष्ण व दमट वातावरण असल्याने घामाच्या धारा वाहत आहे.
पुण्यात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील तापमान १ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे . मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा ११ ते २० अंशापर्यंत गेला आहे. पुढील काही दिवसांत मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ३-४ दिवसात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तब्बल २ ते ३ अंश डिग्री सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या नंतर तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील ४८ तासांत तापमानात फारसा बदल होणार नाही.
मराठवाडयात व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर २२ व २३ जानेवारी रोजी मराठवाडयाच्या काही भागात धुके पडण्याची शक्यता आहे. २४ तासांत कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
संबंधित बातम्या