Maharashtra Weather Update : राज्यात आज मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. या सोबतच चक्रिय वाऱ्यामुळे तापमानात देखील घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात आणि मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. नाशिक, जळगाव जिल्हा देखील थंडीने गारठला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज आणि उद्या तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांचा समावेश आहे. पूर्व विदर्भात आजपासून किरकोळ पावसाची शक्यता आहे असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर गडचिरोली आणि चंद्रपुरातही हलका पाऊस पडू शकतो.
पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेली हवेची चक्रीय स्थिती व बंगालच्या उपसागरावरील प्रती चक्रिय वाऱ्यांमुळे राज्यात आद्रता येत आहे. त्यामुळे उच्चस्तरीय ढग वेळोवेळी तयार होण्यामुळे व उत्तरेकडून हवा न येण्यामुळे पुढील ७२ किमान तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. २५ जानेवारी नंतर तीन ते चार दिवस उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यात विदर्भ सोडून पुढील पाच सात दिवस हवामान कोरडे राहील. पुढील ७२ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी अति हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यात आकाश मुख्यता निरभ्र राहील. २३ व २४ तारखेला वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहील व ७२ तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. २५ जानेवारी नंतर किमान तापमानात साधारण दोन ते तीन डिग्री सेल्सिअस नेटवर्क होण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरातही गारठा जाणवतोय. तर मराठवाडा, विदर्भातील तापमानही घटले आहे. यासोबतच नाशिक आणि निफाडमध्येही थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान पुढचे काही दिवस राज्याला थंडीपासून दिलासा मिळणार नाही अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर भारतात देखील थंडीचा कडाका कायम आहे. धुक्यामुळे रेल्वे आणि रस्त्यासोबत हवाई मार्गही प्रभावित झाला आहे. हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्याचा आणि थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशच्या अधिकांश भागात देखील आज दाट धुके आणि थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.