Maharashtra Weather Update : दक्षिण कर्नाटकापासून पूर्व विदर्भापर्यंत असलेली कमी दाबाची रेषा कायम आहे. हवेच्या वरील थरातील चक्रीय स्थिती उत्तर महाराष्ट्रावर कायम आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थोडेसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील ५ ते ७ दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भामध्ये तापमानात काही प्रमाणात घत होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच उत्तर कोकणामध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
देशात उत्तर भारतात थंडीने कहर केला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, सब-हिमायली पश्चिम बंगाल, सिक्किम आणि मध्य प्रदेश थंडीने गरठले आहेत. येथील तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. तर आसाम, मेघालय, मिझोरम, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुऱ्यात धुक्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप आणि अरुणाचल प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाड्यात गारठा वाढला आहे. पुणे व परिसरातील किमान तापमानात २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असल्याने थंडीत वाढ होणार आहे. उत्तरेकडे गेल्या काही दिवसांपासून बर्फ पडत असून, शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने इथेही थंडी पडत आहे. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद जळगावात ११ अंश सेल्सिअस झाली आहे. तर पुण्यामध्ये १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
मुंबईमध्ये देखील तापमानात घट झाली आहे. मुंबईत सकाळी आणि रात्रीच्या सुमारास थंडी वाढत आहे. पुढील काही दिवस मुंबईत गारठा वाढणार आहे. तर कोकणात देखील थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
संबंधित बातम्या