Maharashtra Weather Update : देशातील मैदानी व डोंगराळ भागात थंडीने उग्र रूप धारण केले आहे. राज्यातील दाखवण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून आज देखील अनेक जिल्ह्यात तापमान कमी होणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात अहिल्यानगर हे महाबळेश्वरपेक्षाही थंड असून या ठिकाणी तापमान ५.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर १९ तारखेनंतर राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील ३ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर १९ आणि २० डिसेंबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, पुणे गोंदिया. परभणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दिनांक १९ रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, व कोल्हापूर घाट विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. व २० डिसेंबर रोजी सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात आज पासून पुढील तीन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. १९ व २० रोजी आकाश निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दक्षिण आणि उत्तर भारतासाठी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडू आणि आसपासच्या भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीचा कहर सुरूच राहणार असून, यामुळे थंडी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट कायम आहे. अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी नोंदविण्यात आले. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात थंडी पडली आहे. आयएमडीने १६ ते २२ डिसेंबर दरम्यान देशातील अनेक भागात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
पंजाब, हरयाणा-चंदीगड आणि उत्तर प्रदेशात १७ ते २० डिसेंबर दरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे आज थंडीचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम राजस्थानमध्ये १६ ते २२ डिसेंबर, पूर्व मध्य प्रदेशात १७ आणि १७ डिसेंबर आणि पश्चिम मध्य प्रदेशात १७ डिसेंबरला थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. थंडीच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लोकांना पुरेशा उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशाच्या अनेक भागात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. १८ डिसेंबरपर्यंत पंजाब, हरियाणा-चंदीगड, उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी दाट धुके राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये १९ डिसेंबरपर्यंत दाट धुके दिसू शकते.
दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि रायलसीमा येथे १७ ते २० डिसेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये विशेषत: १७ आणि १८ डिसेंबर ला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.
पुणे ७.८, अहमदनगर ५.५, जळगाव, ७.८, कोल्हापूर १४.१, महाबळेश्वर १३.५, मालेगाव, ९.६, नाशिक ९.४, सांगली १२.७, सातारा १०.४, सोलापूर ११.५, मुंबई १९.८, सांताक्रूझ १४.०, अलिबाग १७.८, पणजी १९.४, डहाणू १५.०, उस्मानाबाद ९.४, संभाजीनगर ९.६, परभणी ८.२, नांदेड ७.५, अकोला ९.९, अमरावती १०.६, बुलढाणा ११.४, ब्रम्हपुरी ९.९, चंद्रपूर १०.४, गोंदिया ७.४, नागपूर ८.४, वाशिम १३, वर्धा ९.४.
संबंधित बातम्या