Maharashtra Weather Update: राज्यात आता हाडं गोठवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. या वर्षी सर्वाधिक कमी तापमान होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे. १९ तारखेला काही जिल्ह्यात पाऊस तर आज आणि उद्या चारही विभागातील काही जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभागात हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आज जळगाव, अहिल्यानगर, पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर उद्या जळगाव, अहिल्यानगर पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड व गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात आज उद्या आकाश मुख्यता कोरडे राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार राज्याच्या अंतर्गत भागात सध्या अनेक ठिकाणी तापमान ११ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. किमान तापमान आणखी खाली जाऊ शकते पहाटे पहाटे तापमाणात मोठी घट होण्याची शक्यता असून विशेषत: जे त्यांच्या कामासाठी बाहेर असतील. त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन होसाळीकार यांनी केले आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र वगळता येत्या २४ तासांत किमान तापमान ८ ते १४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार लक्षद्विपला जोडून अरबी समुद्राच्या पूर्वेकडीलभागात चक्राकार वारे वाहत असून बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासांत पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे राज्यात काही भागात तापमानात किंचित वाढ होणार आहे.
देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीचं प्रमाण कमी झाले असले तरी पारा शून्य अंशांवर स्थिरावणार असल्याचा अंदाज आहे. याचा परिणाम देखील राज्याच्या हवामानावर होणार आहे.
राज्यात रविवारी नाशिकच्या निफाडमध्ये पारा ६ ते ७ अंशांदरम्यान होता. तर सर्वाधिक कमी तापमान हे धुळे जिल्ह्यात नोंदवण्यात आले. या ठिकाणी ४.१ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहिल्यानगर येथे ६.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
संबंधित बातम्या