
पुणे: अरबी समुद्रात चक्रिय स्थिती निर्माण होणार असल्याने पुढील आठवड्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. यात मुंबई आणि पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता असल्याने गेल्या काही दिवसांपासूंन ऑक्टोबर हिट पासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
उत्तर भारतीय भागातून जाणार्या वाऱ्यामुळे अरबी समुद्रात ही चक्रिय स्थिती निर्माण होणार आहे. या संदर्भात हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केले आहे. पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, असे पुणे वेध शाळेच्या हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी सांगितले. वातावरणातील या बदलामुळे पुणेकरांना ऑक्टोबर हीटपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात बऱ्याच जिल्ह्यात कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवण्यात आले आहे. पुण्यात आणि मुंबईत तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात आठवडाभरापासून ऑक्टोबर हीट जाणवत आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडावे तसेच बाहेर जातांना काळजी घ्यावी असे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.
पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पुढील काही दिवसांत म्हणजेच १३ ते १४ ऑक्टोबरच्या दरम्यान, अरबी समुद्रात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा हिमालयीन प्रदेश आणि पंजाब, राजस्थान इत्यादी वायव्य राज्यांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्रावर देखील होणार असून राज्यातील काही भागात पावसाचा वर्तवण्यात आला आहे.
IMD पुणे येथील हवामान आणि अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, "वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली पुण्यासह महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल. शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहील आणि १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी शहरात हलका ते विलग मुसळधार पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर भागात हलका ते पृथक मुसळधार पाऊस पडेल."
हिमालयासारख्या प्रदेशात चांगली बर्फवृष्टी होण्यासाठी सामान्य आणि काही प्रमाणात वातावरण फायदेशीर आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे देखील राज्यात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या
