Maharashtra Weather Update :राज्यात हवामानात मोठे बदल होत आहे. एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे थंडी देखील वाढत आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पहाटे आणि रात्री कमालीची थंडी पडत आहे. तर दुपारी उन्हामुले जिवाची लाही लाही होत आहे. दरम्यान, चक्राकार वाऱ्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याच्या तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेश शाळेने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशासह केरळच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा सुरु असणारा मारा व पश्चिमी झंझावातामुळं राज्यातील तापमानात लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे. हे सायक्लोनिक सर्क्युलेशन चक्रीवादळात बदलणार का यावर हवामान विभागाची नजर आहे. बंगालच्या खाडीपासून काही अंतरावर व राजस्थानलगतच्या भागात हवामानात मोठे बदल होत आहेत. आज हिमाचल प्रदेशात पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर राज्यात सकाळी व रात्री थंडी वाढणार असून दुपारी मात्र, ऊन पडणार आहे.
पुढील काही दिवस किमान तापमानात घट होऊन पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीलगच्या जिल्ह्यांमध्ये थंडी गायब झाली आहे. येथे तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सकाळी धुके तर तर दिवसा उन्हाचे चटके असे वातावरण येथे आहे. मुंबई व उपनगरात दमट वातावरणामुळे जिवाची लाही लाही होत आहे. तर ठाणे व नवी मुंबईत पहाटे गारवा व दिवसा उष्णता जाणवत आहे.
पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यामधील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. काही दिवस पुण्यात किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात २ अंशांनी वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात व विदर्भातील काही भागांमध्ये थंडी अजूनही कायम आहे. तर दुपारी सूर्य राजा आग ओकत आहे. राज्यात पुढील आठवड्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या