Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीत मोठी वाढ झाली आहे. अनेक जिल्हयाचं तापमान हे १० ११ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे. पहाटे, संध्याकाळी व रात्री मोठा गारठा जाणवू लागला आहे. प्रामुख्याने, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात पारा कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याच परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे. सध्या राज्यात पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. मात्र, कमी दाबाच्या पत्त्यामुळे हवामानात मोठा बदल होणार आहे, अशी शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि हिंद महासागरात कमी दाबाचा तयार झाला आहे. याचा परिणाम देशभरातील हवामानावर झाला आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात दाट धुक्याची चादर पसरली आहे तर तापमानात देखील मोठी घट झाली आहे. राजधानी दिल्लीत पारा ४ अंश सेल्सिअसवर आला आहे.
तर तमिळनाडू, केरळ आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर महाराष्ट्रात देखील दिवसा तापमानात वाढ तर रात्री आणि पहाटे तापमान कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, उपनगर आणि नवी मुंबईमध्ये रात्री व पहाटेच्या सुमारास तापमान कमी होत आहे. हवेत गारवा निर्माण होत असल्याने मुंबईकर सुखावले आहेत. तर ठाण्यात देखील तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे हवेत गारठा वाढला आहे. मुंबई, ठाणे, उपनगर आणि नवी मुंबईमध्ये रात्री आणि पहाटेच्या सुमारास तापमानाचा पारा खाली घसरत आहे.
पुण्यात देखील थंडी वाढली आहे. पहाटे, संध्याकाळी आणि रात्री मोठा गारठा हवेत जाणवू लागला आहे. सकाळच्या सुमारास मोठे धुके पडत आहे. त्यामुळे पुण्यात ठीकठिकाणी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील १ ते ३ डिग्री सेल्सियसने तापमान कमी झाले आहेत. तर पुढील ४८ तासात तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तर धुळे जिल्ह्यात पारा हा १०.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक थंडीने गारठले आहे. दुपारी तापमानात वाढ होत असून काही दिवसानंत गारठा आणखी वाढणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.