Maharashtra weather update : कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या पश्चिम समुद्रावर असून त्याची वाटचाल उत्तरेकडे होत आहे. यामुळे महाराष्ट्रावर बंगालच्या उपसागरात येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पाच तारखेनंतर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची वाटचाल उत्तर दिशेने सुरू आहे. त्यात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून राज्यात बाष्पयुक्त वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी, पाच जानेवारीनंतर पुढील दोन-तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसामुळे राज्यात थंडी वाढणार असून तापमानात देखील घट होणार आहे.
२ ते ४ तारखे दरम्यान, आकाश मुख्यतः निरभ्र राहून अधून मधून अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमान वाढेल. ५ तारखे नंतर आकाश ढगाळ राहणार असल्याने राज्यात तुरळक ठिकाणी अति हलक्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंतर तीन ते चार दिवस पावसामुळे किमान व कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा थंडी जाणवणार आहे.
कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळ ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात पाच तारखेपर्यंत हळूहळू किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दोन ते तीन डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमानात वाढणार आहे. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान कमी झाल्यामुळे थंडी जाणवणार आहे. सोमवारी गोंदिया येथे राज्यातील सर्वांत कमी १२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. रत्नागिरीत सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
राज्यासह दक्षिण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात देखील हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. मंगळवारी पावसाची शक्यता असून बुधवारी पावसाची जोर वाढण्याचा आडंज आहे. पंजाब आणि हरियाणात काही भागांमध्ये, उत्तर प्रदेशच्या काही भागात आणि उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता असून पुढील काही तासात पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मध्य भारताचा काही भाग आणि मैदानी भाग, विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तरी भाग, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग तसेच हरियाणा आणि राजस्थानच्या आसपासच्या भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे.