Maharashtra weather update : राज्यातील हवामानात नव्या वर्षात मोठे बदल होणार आहेत. राज्यात काही जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढल्यामुळे नागरीक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. असे असतांना राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान देखील वाढले आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नव्या वर्षात देखील राज्यातील हवामान ढगाळ राहणार असून यामुळे काही ठिकाणी तापमानात घट तर काही ठिकाणी हवामान उष्ण राहणार आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यावर कुठलीही खास सिस्टम नसल्यामुळे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात येणाऱ्या वाऱ्यामुळे आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. या सुमारास किमान तापमानात एक ते दोन डिग्री सेल्सियसली वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात आज आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. ३१ तारखेपासून पुढे काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी अथवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. यामुळे कमाल तापमानात उद्यापासून पुढे काही दिवस एक ते दोन डिग्री सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे. तर १ जानेवारीपासून किमान तापमानात एक ते तीन डिग्री सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आर्द्रतेमध्ये होणारी वाढ, प्रदूषके आणि ढगाळ वातावरणामुळे मुंबईसह कोकणातील थंडीत घट होणार आहे. कोकणात हवामान ढगाळ राहणार आहे. मुंबईसह कोकणात ३ ते ७ जानेवारी असे ५ दिवस ढगाळ हवामान राहणार आहे.
मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व मध्य महाराष्ट्रातील व विदर्भातील जिल्ह्यात १ ते ७ जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच ढगाळ वातावरण राहील. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात सुरु असलेला थंड हवेचा परिणाम कायम असुन राज्यावर या वातावरणाचा विशेष असा काहीही परिणाम जाणवणार नाही.
मराठवाडा वगळता विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात देखील ढगाळ हवामान राहणार आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान पाऊस पडणार आहे. तर काही राज्यांमध्ये धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भरतात थंडीचा कडाका कायम राहणार आहे.