Maharashtra Weather update : राज्यात गेल्या काही दिवसंपासून तापमानात मोठ घट झाली आहे. अनेक जिल्ह्यात पारा हा १० अंश सेल्सिअसच्याही खाली आला आहे. सध्या विदर्भात थंडी कायम असून फेब्रुवारी महिन्यातही राज्यात थंडी कायम राहणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्यात देखील तापमानात एक ते दोन डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता असून काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार असल्याचे पुणे वेध शाळेने म्हटले आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान वरून पुढे येत आहे. तर आणखी एक पश्चिमी विक्षोभ तयार झाले आहेत. हवेची चक्रिय स्थिती ही नॉर्थ वेस्ट राजस्थान व लगतच्या पंजाब व हरियाणावर आहे. तसेच जेट स्ट्रीम अजूनही उत्तर भारतावर आहेत. त्यामुळे ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात वेळोवेळी उत्तरेकडून हवा येण्यामुळे किमान तापमान घट होण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीनंतर वेळोवेळी आकाश अंशता ढगाळ राहण्यामुळे कमाल तापमानात सुद्धा घट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात तुरळ ठिकाणी हलके धुके पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात आकाश निरभ्र राहणार आहे. पुढील ७२ तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीनंतर एक किंवा दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. ३० जानेवारी नंतर किमान तापमानात साधारण ३ डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीनंतर १ ते २ दिवस कमाल तापमानात साधारण २ ते ३ डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ व २ फेब्रुवारीला दिवसा थंडी जाणवेल.
राज्यात नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, नागपूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. पुण्यात तर ७ डिग्री एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली होती. सध्या तापमान थोडे वाढले असले तरी हुडहुडी कायम आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. राजधानी दिल्लीत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या जम्मू काश्मीरमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टि सुरू आहे. त्यामुळे उत्तरकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातही थंडीचा कडका वाढणार अशी शक्यता आहे.
संबंधित बातम्या