Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे थंडी आणि उष्णता असे संमिश्र वातावरण आहे. या वातावरणात आता पावसाची शक्यता देखील आहे. हवामान विभागाने आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे व घाट परिसर, कोल्हापूर शहर व घाट परिसर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात सध्या थंडीची चाहूल लागली आहे. त्यात फटाक्यांच्या धुरामुळे उष्णता व प्रदूषण देखील वाढलं आहे. मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे थंडी कधी पडणार या प्रतीक्षेत नागरिक आहेत. मुंबईत आज कोरडे वातावरण राहणार आहे. तर तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
तर कोकणात आज व पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वारा, विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, तसेच विजांचा कडकडाट आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्हांमध्येही आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर रविवारपर्यंत पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुण्यात आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुण्याच्या घाट विभागात व शहरात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज शहरात अंशत: ढगाळ हवामान तर इतर वेळी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर अधून मधून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुण्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.