Maharashtra Weather update : राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्याने बुधवारपासून शनिवारपर्यंत राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज देखील हवमान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात पुढील तीन दिवसांसाठी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक तर ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पावसाचा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. बुधवार पासून हा प्रवास सुरू होणार आहे. आता पर्यंत नंदुरबार पर्यंत मौसमी वाऱ्याने माघार घेतली आहे. तर बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत असल्याने विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पावसाने संपूर्ण माघार घेतल्यावर ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवणार आहे.
मुंबई, ठाण्यासह उपनगरात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. नवी मुंबईत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडून ताशी ३० ते ४० किमी प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरात हवामान अंशत: ढगाळ राहणार आहे. तर दिवसभर ऊन देखील पडणार आहे. काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.