Maharashtra Weather update: राज्यात रविवारी थंडीचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तापमानात थोडी वाढ झाली. मुंबई, ठाणे, उपनगर व नवी मुंबईत देखील थंडी कमी होती. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थंडी कमी झाल्याचे अनुभवायला मिळाले. राज्यात थंडी वाढत असताना आता पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्याच्या काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी देखील पावसाचा जोर वाढणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्य़ा व तामिळनाडूसह देशातील प्रामुख्यानं दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या फेंगल या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. चक्रीवादळामुळं तयार झालेले बाष्पयुक्त वारे सध्या थेट राज्याच्या दिशेनं येत असल्यामुळं पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर परिणाम होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या आणि परवा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, घाटमाथा भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच लातूर. धाराशीव आणि नांदेड या जिल्ह्यात देखील पुढील तीन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. ५ डिसेंबर रोजी पुन्हा पावसाचा जोर कमी होणार असून रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीवमध्ये या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पावसाची शक्यता असली तरी थंडी कमी होणार नाही. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. चक्रीवादळाचा परिणाम कमी झाल्यावर ८ डिसेंबरनंतर राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. करण देशाच्या उत्तरेकडील राज्य व अतीव उत्तरेकडे असणाऱ्या बर्फाच्छादित हिमशिखरांवर पश्चिमी झंझावात सक्रीय झाला आहे. या भागात हिमवृष्टीला सुरुवात झाली असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गारठा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
संबंधित बातम्या