Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) काही राज्यांमधून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी ईशान्य मान्सूनमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आग्नेय द्वीपकल्पीय भारतात ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य मोसमी हंगामात जून ते सप्टेंबर दरम्यान भारतात १०८ टक्के पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा जास्त आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात व देशातील काही भागात नवरात्री उत्सवादरम्यान, काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भात ५ आणि ६ तारखेला काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनोत्तर हंगामाचा अंदाज जाहीर करताना आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, "आग्नेय द्वीपकल्पीय भारतात ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान सरासरी ३३४.१३ मिमी पाऊस पडेल, जो ११२ टक्के असेल. याला हिवाळी पावसाळा म्हणतात. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, रायलसीमा, यनम, किनारपट्टीआंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्ये व महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडेल. तामिळनाडूसाठी हा मुख्य पावसाळा असून या काळात राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो.
विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरील ला नीनामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ला नीनाचा प्रभाव हा भारतात ईशान्य मान्सूनवर होत असतो. तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये ला नीना दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो.
आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ईशान्य मान्सून मुख्यत: आंतर-हंगामी विकासावर अवलंबून असेल. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीचा वेग येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. वायव्य आणि उत्तर भारतातून पाऊस थांबण्याची शक्यता आहे.
आयएमडीने म्हटले आहे की, ऑक्टोबर हा देशभरात पावसाचा महिना राहील. या महिन्यात संपूर्ण भारतात सरासरी ७५.४ मिमी पाऊस पडू शकतो. मात्र, ऑक्टोबर महिना जम्मू-काश्मीर आणि पूर्व भारतात कोरडा राहू शकतो.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ५ आणि ६ तारखेला प्रामुख्याने विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसांत या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.